Tuesday 12 September 2017

विकिपीडियावरील लेख उतरवणे

विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे. तो मराठी, इंग्लिशसहित जगभरातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. विकिपीडियाचा प्रकल्प हा उत्स्फुर्तपणे चालवला जातो. देणगीच्या स्वरुपात मिळालेल्या पैशांतून या प्रकल्पाचे कामकाज चालते. पण त्यावर आढळणारी माहिती ही इंटरनेटचा वापर करणार्‍या लोकांनी स्वयंस्फूर्तीने लिहिलेली असते. आपल्यापैकी कोणीही विकिपीडिया संकेतस्थळावरील माहितीत भर घालू शकतो. विकिपीडियाने नेमलेले संपादक आवश्यकता भासल्यास या माहितीचे संपादन करतात. विकिपीडियावरील माहिती ही बर्‍याच अंशी अचूक असते. पण ती पूर्णतः अचूक असते, असे मात्र ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे संदर्भ म्हणून विकिपीडियाचा वापर करत असताना मिळालेल्या माहितीची विश्वासार्हता ही इतर स्त्रोतांशी पडताळणी करुन ठरवावी.

विकिपीडियावरील लेख उतरवणे

PDF हा फाईलचा प्रकार सर्वांना ज्ञातच आहे. अनेक ईपुस्तके ही PDF स्वरुपात उपलब्ध असतात. लिखित स्वरुपातील मजकूर PDF स्वरुपात वाचणे अथवा पाठवणे हे अनेकदा सोयीचे ठरते. विकिपीडियावरील लेख देखील अगदी सहजरित्या PDF स्वरुपात संगणकावर उतरवता येतात, म्हणजेच डाऊनलोड करता येतात.
त्यासाठी संगणकावरील वेब ब्राऊजरच्या सहाय्याने mr.wikipedia.org या संकेतस्थळावर जा आणि माहितीपूर्ण असा कोणताही एक लेख उघडा. आता खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्यासमोर एक पान असेल. त्या पानाच्या डाव्या बाजूला एक साईडबार दिसेल. त्यातील “PDF म्हणून उतरवा” या पर्यायाचा शोध घ्या आणि त्यावर क्लिक करा. त्यानंतर विकिपीडियावरील लेख PDF फाईलच्या स्वरुपात आपल्या संगणकावर उतरवला जाईल.
विकिपीडियावरील लेख PDF
विकिपीडियावरील लेख हे PDF स्वरुपात उतरवता येतात
आपण जर स्मार्टफोन किंवा टॅब वापरत असाल, तर वेब ब्राऊजरमध्ये Desktop Viewची निवड करा. अशाने आपल्याला विकिपीडियाचे संकेतस्थळ हे संगणकावर दिसते, त्या स्वरुपात दिसेल. त्यानंतर विकिपीडियावरील लेखाची PDF फाईल मिळवण्यासाठी वर नमूद केलेली कृती करा. अशाप्रकारे आपण इंग्लिश विकिपीडियावरील लेखही जतन करु शकतो. त्यासाठी Download as PDF या पर्यायाचा वापर करावा.
The following two tabs change content below.

लॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे

मागील महिन्यात मी लॅपटॉपकरिता एक स्पिकर विकत घेतला. या स्पिकरचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे मला स्वतःला तो मनापासून आवडला! पण खास लॅपटॉपसाठी तयार करण्यात आलेल्या या स्पिकर संदर्भात मला एक अडचण जाणवली. या स्पिकरला लॅपटॉपच्या USB पोर्टच्या सहाय्याने वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे लॅपटॉप सुरु असेपर्यंतच हा स्पिकर वापरता येतो. एकदा लॅपटॉप बंद केल्यानंतर या स्पिकरचा वापर करता येत नाही. खास लॅपटॉपसाठी तयार करण्यात आलेला हा स्पिकर या कारणाने स्मार्टफोनसाठी वापरता येत नाही. पण काही दिवसांपूर्वी मला या अडचणीवर एक सोपा उपाय सापडला, तो मी या लेखात देत आहे.
स्पिकरला USB पोर्टने वीजपुरवठा करायचा झाल्यास लॅपटॉपखेरीज आणखी कोणत्या गोष्टीचा वापर करता येईल? यावर विचार केला असता, मला पॉवर बँक वापरण्याची कल्पना सुचली. त्यादृष्टीने मी एक पॉवर बँक वापरुन पाहिली. पण वीज पुरवठ्याच्या दरात तफावत असल्याने ही योजना अयशस्वी ठरली. मी Lenovo 2.0 – M0520हा स्पिकर वापरतो. हा एक स्वस्त आणि चांगला स्पिकर आहे. या स्पिकरला ०.५ ॲम्पिअर दराने वीजपुरवठा करावा लागतो. पण पॉवर बँक या सहसा १ किंवा २ ॲम्पिअर दराने वीजपुरवठा करतात.
पॉवर बँक, लॅपटॉप स्पिकर, स्मार्टफोन
पॉवर बँकवर लॅपटॉपचे स्पिकर चालवता येतात.
त्यानंतर काही दिवसांनी मी TP Linkची पॉवर बँक विकत घेतली. यासंदर्भात मी फेसबुकवरुन माहिती दिली होती. ही एक अगदी उत्कृष्ट पॉवर बँक आहे. तर TP Linkची पॉवर बँक मी लिनोवोच्या स्पिकरला जोडून पाहिली. त्यासाठी मी त्यावरील १ ॲम्पिअरच्या USB पोर्टचा वापर केला. तेंव्हा हा स्पिकर विनासायास काम करु लागला. या पॉवर बँकच्या माध्यमातून स्पिकरसाठी आवश्यक त्या प्रमाणात वीज पुरवठा होतो. त्यामुळे आता लॅपटॉप बंद केल्यानंतर मी हे स्पिकर माझ्या स्मार्टफोनला अगदी सहज जोडू शकतो. स्पिकरसाठी फारशी वीज लागत नाही. तेंव्हा एकदा पॉवर बँक चार्ज केल्यानंतर त्यावर हा स्पिकर अनेक तास चालू शकतो. त्यामुळे लॅपटॉपचा स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरण्यासाठी ही एक चांगली क्लुप्ती आहे.
The following two tabs change content below.

मराठीचा इंटरनेटवरील विकास

‘ज्ञान’ मिळवल्याने मानवी जीवनास एक नवी दृष्टी प्राप्त होते. पर्यायाने माणसाचा आध्यात्मिक तसेच आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो. पूर्वी काहीजणांपुरते मर्यादित असलेले ‘ज्ञान’ हे इंटरनेटमुळे आता सर्वांपर्यंत पोहचले आहे. ज्याला कोणाला म्हणून ज्ञान प्राप्त करायची इच्छा आहे, त्या प्रत्येकासाठी इंटरनेटरुपी महासागर आज खुला आहे. परंतु यात एक छोटासा अडसर आहे! एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवायचे झाल्यास त्यासाठी इंग्लिश भाषा अवगत असणे गरजेचे आहे. ज्यांना इंग्लिश भाषा येत नाही, त्यांना सखोल शिक्षणापासून वंचित रहावे लागते. तेंव्हा विकासाची नदी सर्वांपर्यंत पोहचावी याकरिता आपली मराठी भाषा ‘ज्ञानभाषा’ होणे अत्यावश्यक आहे. परंतु कोणतीही गोष्ट अर्थकारणाच्या व्यवहारिक चौकटीत बसवल्याखेरिज तिला मूर्तरुप येत नाही. तेंव्हा ‘ज्ञानार्जन’ आणि ‘अर्थार्जन’ अशा दोन्ही बाजूंनी मराठीच्या भवितव्याचा विचार व्हायला हवा. विशेष म्हणजे मराठी भाषिकांनी मनावर घेतल्यस मराठीचा, पर्यायाने आपला स्वतःचा उत्कर्ष साधने सहजशक्य आहे!

मराठी शोध परिणाम – मराठी गूगल

इंटरनेटची सुरुवातच मुळी ‘सर्च इंजिन’पासून होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधायची झाल्यास आज बहुतांश लोक गूगलचा वापर करतात. परंतु आपल्यापैकी किती लोक ‘मराठी गूगल’चा वापर करतात!? हा खरा प्रश्न आहे! ‘मराठी गूगल’चा वापर करायचा झाल्यास गूगलच्या शोध चौकटीखाली (Search Box) देण्यात आलेला ‘मराठी’ भाषेचा पर्याय निवडावा. आपल्या मनामधील प्रश्नाचे उत्तर जर मराठी भाषेतून हवे असेल, तर मराठी गूगलच्या शोध चौकटीत मराठी ‘सारशब्द’ (Keywords) टाकावेत. त्याकरिता Google Indic Keyboard (अँड्रॉईडसाठी) आणि Google Input Tools (संगणकासाठी) हे गूगलचे मोफत मराठी कीबोर्ड वापरता येतील. मराठीमधून शोध घेतल्याने मराठी शोध परिणाम आपल्यासमोर दिसू लागतात. परंतु त्याचवेळी त्यात काही हिंदी शोध परिणामांची देखील रसमिसळ झालेली असू शकते. मराठी व हिंदी या दोन्ही भाषांकरिता देवनागरी लिपीचा वापर होत असल्याने असे होत असावे, असे वरकरणी वाटू शकते. परंतु हिंदी गूगलमध्ये शोध घेतला असता एकही मराठी शोध परिणाम समोर येत नाही; शिवाय ‘ळ’ हे अक्षर आणि मराठी शब्द यांच्या सहाय्याने गूगलला इंटरनेटवरील मराठी पान ओळखणे सहजशक्य आहे.
मराठी गूगल
इंटरनेटवर मराठीमधून शोध – गूगलची मराठी आवृत्ती – मराठी गूगल
मराठी गूगलमध्ये शोध घेतल्यानंतर जर एखाद्यास इंटरनेटवरील मराठी पान सापडणार नसेल, तर अशाने मराठीची मोठी पिछेहाट होईल. गूगल सर्वसामान्य वापरकर्त्यांची फारशी दखल घेताना दिसत नाही, तेंव्हा महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाने यादृष्टीने गूगलकडे योग्य तो पाठपुरावा करायला हवा.

हजारो इंग्लिश पुस्तके मोफत!

पूर्वीच्या काळी पुस्तकांचा खजिना हवा असेल, तर वाचनालयात जावे लागत असे. परंतु आजकाल आपल्या स्मार्टफोनवर डिजिटल वाचनालय उपलब्ध होऊ लागल्याने वाचनालयात जाण्याची तशी फारशी गरज उरलेली नाही. Gutenberg Books नावाचा अनुप्रयोग (ॲप) याबाबतचे एक उत्तम उदाहरण आहे. या अनुप्रयोगाच्या सहाय्याने तब्बल ५० हजारांहून अधिक इंग्लिश पुस्तके आपल्या स्मार्टफोनवर अगदी सहज मोफत उपलब्ध होतात.
लेखकाच्या निधनानंतर ६० वर्षांनी लेखकाची पुस्तके प्रताधिकार (कॉपीराईट) मुक्त होतात. म्हणजेच त्यावर कोणाचाही अधिकार न राहता ही पुस्तके समाजासाठी खुली होतात. Gutenberg Books सारखे अनुप्रयोग अशी सारी पुस्तके आपल्याला दर्जेदार स्वरूपात अधिकृतरित्या मोफत उपलब्ध करुन देतात.
Screenshot_2017-03-11-19-31-31-329
मोफत इंग्लिश पुस्तके
Gutenberg Books हा अनुप्रयोग गुगल प्ले स्टोअरमध्ये मोफत उपलब्ध आहे. हा अनुप्रयोग वापरण्यास सुरुवात केल्यानंतर आपणास सुरुवातीला कदाचित तळाशी जाहिरात दिसेल. जाहिराती बंद करण्यासाठी या अनुप्रयोगाच्या Library विभागात (तळाशी तीन पुस्तकांचे चिन्ह) यावे. इथे वर उजव्या बाजूला सेटिंगचे चिन्ह आहे. तिथून सेटिंगमध्ये जावे. Upgrade to Gutenberg Pro या पर्यायावर स्पर्श करावा. या अनुप्रयोगासंदर्भात प्ले स्टोअरवर Review लिहून आपणास मोफत Upgrade करता येईल. त्यानंतर या अनुप्रयोगात जाहिरात दिसणार नाही, तसेच आपणास कितीही पुस्तके स्मार्टफोनवर डाऊनलोड करता येतील.
The following two tabs change content below.

Sunday 10 September 2017

मेमरी कार्डचा पासवर्ड काढणे

मेमरी कार्ड पासवर्डने सुरक्षित केल्यानंतर अनेकजण तो पासवर्ड विसरतात. मेमरी कार्डचा हा पासवर्ड कसा काढायचा? याबाबत मला आपल्यापैकी एक-दोन जणांनी विचारले होते. म्हणूनच आजचा हा लेख लिहित आहे. या लेखात सांगितलेली पद्धत मी स्वतः तपासून पाहिलेली नाही. त्यामुळे या माहितीचा उपयोग होईलच असे मला ठामपणे सांगता येणार नाही. या लेखात दिलेल्या माहितीचा वापर हा आपण काळजीपूर्वक करावा. आपल्याला जर खाली दिलेल्या क्लुप्तीचा उपयोग झाला, किंवा याबाबत अधिकचे काही सांगायचे असेल, तर या लेखाच्या शेवटी प्रतिक्रिया लिहून कळवावे.

मेमरी कार्ड पासवर्ड मिळवण्याची क्लुप्ती

  1. आपल्या फोनवरील फाईल मॅनेजर उघडा.
  2. System फोल्डरमधील mmcstore नावाच्या फाईलचा शोध घ्या. C:\Sys\Data मध्ये पहा. शक्य झाल्यास फाईल मॅनेजरमधील सर्च बॉक्सचा वापर करा.
  3. mmcstore ही फाईल मोबाईलवर सापडली असेल, तर ती संगणकावर कॉपी करा.
  4. ही फाईल Notepadच्या सहाय्याने उघडा. त्यात आपल्याला हरवलेला पासवर्ड दिसेल. या पासवर्डचा वापर करुन मेमरी कार्डचे कुलूप उघडता येईल.
मेमरी कार्ड
मेमरी कार्ड
मेमरी कार्डचा पासवर्ड मिळवण्याची ही एक क्लुप्ती आहे. दुसरं असं की, आपल्या मेमरी कार्डवर जर महत्त्वाच्या फाईल्स नसतील, तर आपण आपले मेमरी कार्ड फॉरमॅटही करु शकाल. अशाने मेमरी कार्डवरील सर्वकाही पूर्णतः डिलीट होईल, पण एकदा कार्ड फॉरमॅट केल्यानंतर पुन्हा पासवर्डची आवश्यकता भासायची नाही. शेवटी या लेखात दिलेली कोणतीही माहिती मी स्वतःहून तपासून पाहिलेली नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
The following two tabs change content below.